जिल्ह्यातील उद्योग- व्यापारी संघटनांशी जिल्हा प्रशासनाचा संवाद

जिल्ह्यातील उद्योग- व्यापारी संघटनांशी जिल्हा प्रशासनाचा संवाद

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जाणून घेतली उद्योग क्षेत्राचे म्हणणे


। अहमदनगर । दि.15 जुलै । कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अर्थचक्र विस्कळीत होई नये आणि ते सुरळीतपणे सुरु राहील यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी नगर शहरातील विविथ उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने उद्योग व्यवसाय सुरळीत सुरु राहतील यादृष्टीने पावले टाकली. त्यामुळे पुन्हा व्यवसाय सुरु होऊ शकले. मात्र, वेळ वाढवून मिळावा अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली. कोविड सुसंगत वर्तणूकीचे पालन बंधनकारक असून त्या अनुषंगाने उद्योगांनी कार्यवाही करणे अपेक्षित असून त्यांच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवू, असे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील संघटना आणि प्रमुख उद्योजकांशी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी चर्चा केली. अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे,  निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, एमआयडीसीचे व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चरचे चेअरमन अरविंद पारगावकर, असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरर्स इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी संगमनेर डॉ. शशीकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी शिर्डी गोविंद शिंदे, उपविभागीय अधिकारी कर्जत-जामखेड अर्चना नष्टे यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्ह्यातील अर्थचक्र सुरळीत सुरु राहील, त्यादृष्टीने कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करुन उद्योजक आणि व्यापारी असोसिएशन कशा प्रकारे उद्योग सुरु ठेवू शकतील, यासंदर्भात जिल्ह्याचा आराखडा तयार करणार आहोत. उद्योजक, व्यापारी यांचे म्हणणे राज्य शासनाकडे पाठवू. मात्र, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यादृष्टीने सर्व उद्योगांनी पूर्वकाळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय पूर्ण बंद राहिले. त्यामुळे अर्थचक्र पूर्णपणे थांबल्याचे चित्र होते. 

संभाव्य तिसऱ्या लाटेत अर्थचक्र सुरळीत सुरु राहावे, या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळण्यासाठी उद्योगांनी तेथे काम करणाऱ्या कामगार वर्गाची दैनंदिन तपासणी कऱणे आवश्यक आहे. तसेच. किमान शंभर खाटांची व्यवस्था असणारे कोविड केअर सेंटरची व्यवस्था त्याठिकाणी केली गेली असली पाहिजे. नगर येथील उद्योगात काम करणारे बहुतांश कामगार हे आसपासच्या गावांतून येतात. त्यांना कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास प्रवृत्त करणे, त्यासाठीची जनजागृती उद्योग -आस्थापनांनी करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात साधारणता तीन हजार उद्योग असून त्याठिकाणी एक लाखाहून अधिक कामगार काम करीत आहे. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत कशाप्रकारे हे उद्योग सुरु ठेवता येतील, यासंदर्भात या उद्योजक प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. बराचसा कामगार वर्ग हा बाहेरुन ये- जा करणारा असतो. त्यामुळे तो प्रतिबंधीत क्षेत्रातून येणारा नसावा, कारण, उद्योगातील एखाद्याला जरी कोरोनाची लागण झाली तरी संसर्गाची भीती इतरांना असते. त्याचा परिणाम उद्योगांवर होतो. हे टाळण्यासाठी उद्योगांनी पूर्वकाळजी घेतल्यास त्यास आळा बसू शकेल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.

उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱी उपकरणे अथवा साहित्य निर्माण करणारी लघु उद्योगांचे अर्थचक्रही सुरळीत राहील यासाठी आवश्यक उपाययोजना संबंधितांनी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post