सहाजणावर खंडणीचा गुन्हा

। अहमदनगर । दि.18 जुलै ।  दिल्लीगेट येथे बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे बारा गाळ्यांचा साठ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास शिवसेनेचा नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव याच्यासह सहाजणांनी खंडणी मागितल्याची घटना सोमवार दिनांक 12 जुलै ते गुरुवार 15 जुलै दरम्यान दिल्लीगेट येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, विजय सामलेटी यांच्यासह श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे इतर लोक दिल्लीगेट येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते. गाळ्याची देखरेख करत असताना गिरीश जाधवसह त्याचे भाऊ व साथीदार त्याठिकाणी आले. 

यावेळी ते श्रीपाद छिंदम याला म्हणाले, हे गाळे तुम्ही येथे कसे उभे केले, तू मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही. तुला काही बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे बारा गाळ्यांचे साठ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. माझ्यावतीने आमचा कोणीही माणूस येईल आणि हप्ता घेऊन जाईल. हप्ता द्यायची अगोदरच तयारी करून ठेवायची, असा दम दिला.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी विजय सामलेटी (रा.तोफखाना) यांच्या फिर्यादीवरून गिरीश जाधव याच्यासह राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतीक बोडखे यांच्याविरुध्द खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post