। अहमदनगर । दि.06 जुलै । स्वप्नील लोणकर (24) या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली मुख्य परीक्षा पास करूनही दोन वर्ष नियुक्ती रखडत ठेवली. नैराश्यातून त्याने रविवारी आत्महत्या केली.
ही घटना अत्यंत गंभीर असून आणखी आत्महत्या टाळायच्या असतील, तर राज्य सरकारने पदभरती करावी. रखडलेल्या उमेदवारांच्या त्वरित नियुक्त्या कराव्यात. दिरांगाई करणारे अधिकारी व आयोगावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी छात्रभारती संघटनेने राज्यपालांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
प्रशासनात हजारो रिक्त पदे असूनही कमी जागांच्या जाहिराती देऊन त्याही वेळेवर निघत नाहीत. निघाल्यातरी ठरलेल्या वेळी परीक्षा होत नाही. परीक्षा झाल्याच तर वर्षानुवर्षे निकाल नाही. परीक्षा पास झाल्यानंतरही उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नुकसान होतेय.
यासाठी छात्रभारतीच्या मागण्या विचारात घेऊन कारवाई करावी, अशी मागणी छात्रभारतीचे राज्य संघटक अनिकेत घुले, राज्य सदस्य गणेश जोंधळे, प्रशांत काकड आदींनी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यामार्फत राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनातून केली.
Tags:
Ahmednagar