5 जुलैच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
शिक्षक परिषदेचे तालुकास्तरावर बैठका
। अहमदनगर । दि.02 जुलै । शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार दि.5 जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव तालुक्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची बैठक पार पडली. बाळासाहेब भारदे हायस्कूल मध्ये झालेल्या बैठकित जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष बबन शिंदे,
शेवगाव तालुकाध्यक्ष सुरेश विधाते, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक सत्यवान थोरे, प्रदीप बोरुडे, अशोक कदम, मच्छिंद्र लांघे, बाबासाहेब दुर्गे, एकनाथ टाके, देवीप्रसाद जोशी, तालुका सचिव रवींद्र पवार ,निलेश मोरे, सुयोग बकोरे, दिलीप पालमकर, विशाल जहागीरदार, वर्षा खिलारी, विनिता जोशी, सरिता गायकवाड, सुवर्णा मगरे आदी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेमार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन त्याची दखल घेण्यात आलेली नाही. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी शिक्षक परिषदेने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, संपुर्ण राज्यात 5 जुलै रोजी आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाचे नियम पाळून बैठक घेण्यात येत आहे. नुकतीच शेवगाव तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची बैठक पार पडली.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, शिक्षक, शिक्षकेतरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र राज्य सरकारकडून शिक्षकांच्या प्रश्नी दुर्लक्ष होत आहे. शिक्षक, शिक्षकेतर आपल्या न्याय, हक्काच्या मागण्यापासून वंचित असून, हे प्रश्न दिवसंदिवस गंभीर बनत चालले आहेत.
शिक्षकांनी एकजुटीने आपला असंतोष व्यक्त करुन प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच 5 जुलै रोजी होणार्या राज्यव्यापी आंदोलनात कोरोना नियमांचे पालन करुन निवेदन देणे व काळ्या फिती लाऊन काम करण्याचे सूचना केल्या. महेंद्र हिंगे यांनी जुनी पेन्शनचा मुद्दा उपस्थित करुन शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.