। अहमदनगर । दि.05 जुलै । संगमनेर येथे नुकतेच बदलून आलेले सहायक वन संरक्षक विशाल किसन बोराडे ( वय 40 ) यांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना आज सायंकाळी सातच्या सुमारास आळेफाटा चौकात घडली.
संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील पूर्वी वनक्षेत्रात येणारी शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीचे निर्वणीकरण कसे व केव्हा झाले या बाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांना देण्यासाठी तक्रारदार यांनी अहवालाची मागणी केली होती. मात्र त्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
याबाबत राज्याचे वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांना तक्रारदार यांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वीय सहायकामार्फत हे रेंगाळलेले काम त्वरीत व सुस्पष्ट अहवालासह देण्याचे आदेश वनाधिकारी बोराडे यांना दिले होते.
मात्र हे आदेश डावलून मागणी कायम ठेवली होती. पैशासाठी तक्रादाराला यांना संगमनेरला बोलावले होते. त्यावेळी पैसे देण्याचे ठिकाण ठरविण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
त्यानुसार या पथकाने आळेफाटा येथे सापळा लावला होता. आज सायंकाळी सातच्या सुमारास लाचेची 40 हजारांची रक्कम स्विकारताना पथकाने बोराडे यांना रंगेहात पकडले.
नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक, सुनील कडासने, अपर पोलिस अधिक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक हरिष खेडकर, पोलिस, निरीक्षक शाम पवरे, पोवीस नाईक विजय गंगूल, रविंद्र निमसे, चालक हवालदार हरुण शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.