। नवी दिल्ली। दि.18 जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून यावेळी नेमकी कोणत्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मात्र शरद पवार यांनी ट्विटरवरून या भेटीबाबत माहिती दिली असून राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे म्हटले आहे. मात्र काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय तर्क-वितर्कांना प्रचंड उधाण आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी ही भेट घेण्यासंदर्भात आधीच माहिती दिली होती. गुरुवारी मुंबईत शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याबाबत पूर्वकल्पना दिली होती, असे कळते आहे. तसेच कालच शरद पवार यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. तसेच पंतप्रधानांच्या भेटीच्या आधी पियुष गोयल यांचीदेखील पवारांसोबत भेट झाल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
दरम्यान, २०१४ पासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मात्र २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातल्या भेटीगाठी अगदीच कमी झाल्या होत्या. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाली आहे.