खिशातील मोबाईलचा झाला स्फोट ; भाजल्याच्या जखमा, सुदैवाने मोठी हानी नाही

। अहमदनगर । दि.08 जुलै । श्रीगोंदा शहरातील नगरसेविका सीमा गोरे यांचे पती प्रशांत गोरे यांच्या पँटच्या खिशातील विव्हो कंपनीच्या मोबाईलचा बुधवारी सायंकाळी अचानक स्फोट झाला. यात गोरे यांच्या पायाला दोन ठिकाणी भाजले आहे. सुदैवाने यात गोरे यांना जास्त दुखापत झालेली नसली तरी या घटनेने मोबाईल वापरणारे युवक-युवती तसेच विशेषत: मोबाईल जास्त प्रमाणात वापरणार्‍या लहान मुलांच्या पालक वर्गात खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रशांत गोरे हे पेडगाव रस्त्यावर एका व्यक्तीशी बोलत होते. याच दरम्यान अचानक त्यांच्या पँटच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल मॉडेल वाय 71 या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यांनतर खिशातील मोबाईलने पेट घेतला. गोरे यांनी समयसूचकता दाखवल्यामुळे यात त्यांना जास्त दुखापत झाली नाही. 

यात मोबाईलचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाच्या आवाजाने बाजूला असलेले लोक धावत त्याठिकाणी आले. विशेष म्हणजे हा मोबाईल स्विच ऑफ होता तरीसुद्धा त्याचा असा स्फोट झाला, हे विशेष. त्यानंतर गोरे यांनी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. सुदैवाने गोरे यांना यात जास्त दुखापत झालेली नाही. स्विच ऑफ व विव्हो सारख्या प्रसिद्ध कंपनीच्या मोबाईलचा स्फोट झाला असल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, मोबाईलचा स्फोट होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post