। मुंबई । दि.12 जुलै । मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
मिळालेली माहिती अशी की, मराठा क्रांती मुक मोर्चानंतर काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. यानंतर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. अखेर आज हे सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहेत.
स्वत: खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.
तसेच धनंजय मुंडे यांनीही मराठा आरक्षणात सहभागी युवकांवर तत्कालीन भाजप सरकारने दाखल केलले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
या सर्व मागण्यांचा विचार करुन अखेर आज राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाचे सरसकट गुन्हे मागे घेतले. याबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनी छत्रपती संभाजीराजे यांचे आभार मानले आहेत.