राष्ट्रीय फुलपाखरासाठी होणार निवडणूक!


पुणे, (दि.16 सप्टेंबर): देशात महाराष्ट्राने फुलपाखराला पहिल्यांदा राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. आता देशाचे राष्ट्रीय फुलपाखरू ठरविण्यासाठी अभ्यासक सरसावले आहेत. यासाठी निवडणूक घेतली जात आहे. लोकांना सातपैकी एका फुलपाखरास मत देता येईल. यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मत नोंदविता येणार आहे.



निवडणुकीसाठी अभ्यासक आणि राज्य जैवविविधता मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सर्वाधिक मते पडणारे फुलपाखरू ‘राष्ट्रीय फुलपाखरू’ म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. सप्टेंबर हा फुलपाखरू महिना म्हणून साजरा केला जातो. नागरिकांनी फुलपाखरांविषयी जाणावे, त्यांचे संवर्धन करावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 

फुलपाखरू निवड अभियानात डॉ. कृष्णमेघ कुंटे, आयझॅक किहिमकर, दिवाकर ठोंबरे, डॉ. कलेश, अशोक सेनगुप्ता, स्वराज राज, अमोल पटवर्धन, हेमंत ओगले, डॉ. विलास बर्डेकर, विजय बर्वे यांसह विविध अभ्यासक सहभागी झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post