दिव्यांगांची मानधनाबाबत होणारी अडवणूक व ससेहोलपट थांबवावी


नगर, (दि.17 सप्टेंबर) : संपूर्ण मानव जातीला हैराण करुन सोडणाऱ्या कोरोना या आजाराने देशातील सर्वसामान्य जनजीवन आज विस्कळीत केले आहे. प्रशासन या आजारावर रात्रंदिवस काम करत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या आजारामुळे सर्वांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मोलमजुरी करणाऱ्या हातांना काम नाही, सर्व व्यवसाय बंद आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. 

 

स्वतःचे व कुटंबाचे उदरनिर्वाह करणेही अवघड झाले असताना दिव्यांग व्यक्तीची आजची परिस्थिती खूपच बिकट झालेली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगासाठी मिळणारे शेषनिधीनतील ५ टक्के अनुदान तेही दर महिन्याला मिळत नाही. त्यातच बऱ्याच दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन चालू असल्याने मानधन देता येत नाही, असे सांगितले जाते. आम्ही सर्व प्रशासकीय यंत्रणेला सांगू इच्छितो की, असा कोणताही आदेश नसताना आमच्या दिव्यांग बंधू व भगिनी यांना महानगरपालिकेच्या मानधनापासून वंचित ठेवले जात आहे. 

 

संजय गांधी निराधार पेन्शन ही योजना १९८0 पासून गोरगरीब जनतेसाठी असणारा उपक्रम आहे व महापालिकेचे मानधन हे महसूलातील ५ टक्के दिव्यांगांची हक्काची रक्कम आहे. तरी शहरातील सर्व दिव्यांगांना या योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला मिळावा. जिल्हा प्रशासनाने दिव्यांगांना नोटीसा पाठवून पेन्शन बंद करण्याचा जो घाट घातला आहे, त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. दिव्यांगांना न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील दिव्यांग उपोषणाला बसतील, याची सर्व जबाबदारी शासनाची राहील, असे निवेदन महानगर पालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना रूद्र अपंग संघटनेच्यावतीने देताना जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे व नगरसेवक बाळासाहेब बोराटे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सचिव बापू पांडुळे, महिला सरचिटणीस दिपाली पडोळे, नगर तालुकाध्यक्ष रामेश्वर तुपे व विजय पडोळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post