कन्टेंमेंट झोनसाठी यापूर्वीचे प्रतिबंध कायम राहणार : दुकाने उघडी ठेवण्याची वेळ आता सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत

वस्तू आणि व्यक्तींच्या आंतरजिल्हा वाहतुकीवर निर्बंध नाहीत


नगर, (02 सप्टेंबर) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्याचबरोबर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई राहील. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी इतर व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर फिरण्‍यावर रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत निर्बंध राहील. कन्‍टेंन्‍मेंट झोनसाठी यापूर्वीचे निर्बंध लागु राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा म्‍हणुन अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली या ठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेगाळणे असे कृत्‍य करण्‍यास दि. 1 सप्‍टेंबर 2020 रोजीचे मध्यरात्री पासुन ते दि. 30 सप्‍टेंबर रोजीचे मध्यरात्रीपर्यंत फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये खालील बाबींस मनाई राहील.

जिल्‍ह्यामध्‍ये शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्‍था, दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत बंद राहतील. तथापी, ऑनलाईन / दूरस्‍थ शिक्षणास परवानगी राहील व त्‍यास प्रोत्‍साहित केले जाईल. सिनेमा हॉल्‍स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर (मॉल्‍स व मार्केट कॉप्‍लेक्‍स मध्‍ये असलेले देखील), बार, पेक्षागृहे, असेंब्ली हॉल्‍स आणि तत्‍सम ठिकाणे बंद राहतील. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्‍या हवाई प्रवासी वाहतुक व्‍यतिरिक्‍त सर्व प्रकारची आंरराष्‍ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीस मनाई राहील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रम व जमावाने सार्वजनिकरित्‍या एकत्र येणे इत्‍यादीसाठी मनाई राहील. सर्व प्रकारची धार्मिक स्‍थळे / प्रार्थना स्‍थळे नागरिकांच्‍या प्रवेशासाठी बंद राहतील. यापूर्वीच्‍या आदेशाद्वारे खुले ठेवण्‍यास परवानगी असणारे सर्व अत्‍यावश्‍यक सेवा आस्‍थापना / दुकाने यापुढेही सुरू राहतील. *सर्व बिगर अत्‍यावश्‍यक बाजारपेठा / दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहतील.

सर्व अत्‍यावश्‍यक नसलेली दुकाने वेळोवेळी जारी केलेल्‍या मार्गदर्शक तत्वानुसार सुरू ठेवण्‍यास परवानगी राहील. मद्याची दुकाने सुरू राहतील. हॉटेल्‍स आणि लॉज शंभर टक्‍के क्षमतेने (शारीरिक अंतर ठेवून व स्‍वच्‍छतेच्‍या उपाययोजनांसह) सुरू राहतील. सर्व राज्‍य सरकारी कार्यालये (आपत्‍कालीन सेवा, आरोग्‍य व वैद्यकिय सेवा, कोषागार, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, पोलीस, एनआयसी, अन्‍न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके आणि नगरपालिका सेवा वगळता) पुढीलप्रमाणे कार्यरत राहतील. गट अ आणि ब अधिकारी 100 टक्‍के, गट अ आणि गट ब व्‍यतिरिक्‍त इतर 50 टक्‍के क्षमतेने किंवा कमीत कमी 50 कर्मचारी संख्‍या यापैकी जे जास्‍त असतील ते कार्यालयात उपस्थित राहतील. कोविड-19 चा प्रसार टाळण्‍यासाठी सामाजिक अंतर, मास्‍क लावणे इत्‍यादी निकषांचे पालन केले जाते किंवा कसे याची खात्री करण्‍यासाठी प्रत्‍येक कार्यालयात दक्षता अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात यावी. 

प्रत्‍येक कार्यालयात सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्‍याचे मार्ग आणि सामाईक भागामध्‍ये स्क्रिनिंग आणि स्‍वच्‍छता उपाययोजना जसे की, थर्मल स्‍कॅनिंग, हॅंड वॉश आणि सॅनिटायझर तसेच मास्‍क कर्मचा-यांना उपलब्‍ध करून द्यावेत. सर्व खाजगी कार्यालये आवश्‍यकतेनुसार 30 टक्‍के पर्यंत क्षमतेने कार्य करु शकतात. तथापि सर्व आस्थापनांनी कर्मचा-यांना कोविड-19 चे अनुषंगाने पुरेशी खबरदारी घेण्‍याबाबत जागरूक करण्‍यासाठी कार्यक्रम घ्‍यावेत, जेणेकरुन घरी परततांना असुरक्षित गट विशेषतः वृध्‍दांना त्रास होणार नाही. कोविड-19 चा प्रसार टाळण्‍यासाठी सामाजिक अंतर, मास्‍क लावणे इत्‍यादी निकषांचे पालन केले जाते किंवा कसे याची खात्री करण्‍यासाठी प्रत्‍येक कार्यालयात दक्षता अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात यावी. कामकाजाच्‍या वेळेची सुनियोजितपणे आखणी करावी आणि केवळ कामाशी संबंधित हालचालींना परवानगी देण्‍यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

व्‍यक्‍ती आणि वस्‍तुच्‍या आंतरजिल्‍हा हालचालींवर कोणतेही बंधन राहणार नाहीत अशा हालचालींसाठी वाहने व प्रवास करणा-यांना स्‍वतंत्र परवानगी / मान्‍यता /ई-परमीटची आवश्‍यकता असणार नाही. खाजगी बस / मिनी बस आणि इतर ऑपरेटर्स यांना प्रवासी वाहतुकीस परवानगी राहील. यासाठी परिवहन आयुक्‍त महाराष्‍ट्र यांचे द्वारा आदर्श कार्यप्रणाली निर्गमित करण्‍यात येईल.

 बा‍ह्य शारिरी‍क क्रियाकल्‍पांना परवानगी राहील. सर्व सार्वजनिक आणि खाजगी परिवहन व्‍यवस्‍था नियमितपणे प्रवासी व्‍यवस्‍थापनाचे पालन करणे आणि मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहील. टॅक्सी, कॅब, अॅग्रीगेटर (१+३), रिक्षा (१+२), चारचाकी (१+३), दुचाकी (१+१ हेल्मेट आणि मास्कसह) परवानगी देण्यात आली आहे. पासष्ट वर्षांपेक्षा जास्‍त वयोगटातील व्‍यक्‍ती, इतर आजार असणार्‍या (को-र्मोबीड) व्‍यक्‍ती, गर्भवती महिला व 10 वर्षापेक्षा कमी वयाचे मुले यांना अत्‍यावश्‍यक आणि आरोग्‍याचे कारण वगळता घरीच राहण्‍याचा सल्‍ला राहील.

सार्वजनिक ठिकाणी, कामाच्‍या ठिकाणी व प्रवास करतांना मास्‍क लावणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी, सर्व व्‍यक्‍तींनी कमीत कमी 6 फूट (2 गज की दूरी) इतके अंतर राखले पाहिजे. दुकानदार ग्राहकांमध्‍ये शारीरिक अंतर राखण्‍याची सुनिश्चिती करतील आणि एकावेळी पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना मुभा देणार नाहीत. मोठी सार्वजनिक संमेलने / भव्‍य सभा यांस मनाई राहील. विवाहासंबंधी कार्यक्रमात एकत्र जमणे, पाहुण्‍यांची कमाल संख्‍या 50 पेक्षा अधिक असणार नाही. अंत्‍यसंस्‍कार / अंत्‍यविधी यासंबधीतील कार्यक्रमात एकत्र जमणे यासाठी  व्‍यक्‍तींची संख्‍या 20 पेक्षा अधिक असणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे संबंधित स्‍थानिक प्राधिकरणाद्वारे, त्‍यांचे कायदे, नियम, विनियम यांनुसार विहित करण्‍यात येईल, अशा दंडाच्‍या शिक्षेस पात्र असेल. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू इत्‍यादींच्‍या सेवनास मनाई राहील.

कामाच्‍या ठिकाणांबाबतचे अतिरिक्‍त निर्देश - घरातून काम करणे, शक्‍य असेल तेथवर, घरुन काम करण्‍याची पध्‍दत अनुसरण्‍यात यावी. कामाची ठिकाणे, दुकाने, बाजारपेठा आणि औद्योगिक व वाणिज्यिक आस्‍थापना यामध्‍ये / कामकाजाच्‍या वेळांचे सुनियोजितपणे आखणी करावी. औष्णिक परिक्षण (थर्मल स्‍कॅनिंग), हात स्‍वच्‍छ करण्‍याचे द्रव्‍य (हॅण्‍डवॉश) व निर्जंतुकीकरण द्रव्‍य (सॅनिटायझर) हे सर्व प्रवेशद्वाराजवळ व निर्गमन द्वाराजवळ आणि सामाईक क्षेत्रांत पुरविण्‍यात यावे. संपुर्ण कामाच्‍या ठिकाणचे, सामाईक सुविधांचे व मानवी संपर्कात येणा-या सर्व जागा यांचे ( उदाहरणार्थ दरवाजांच्‍या मुठी इत्‍यादींचे) कामाच्‍या पाळ्यामध्‍ये वारंवार निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्‍याची सुनिश्चिती करावी. कामाच्‍या ठिकाणांच्‍या सर्व प्रभारी व्‍यक्‍ती, कामगारांमध्‍ये पुरेसे अंतर राखणे, कामाच्‍या पाळ्यांदरम्‍यान पर्याप्‍त अंतर ठेवणे, दुपारच्‍या जेवणाच्‍या वेळेत पुरेसे अंतर राखणे, इत्‍यादीद्वारे सामाजिक अंतर राखण्‍याची सुनिश्चिती करतील.

जिल्‍ह्यातील कन्टेन्टमेंट झोन वगळता यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या आदेशांद्वारे प्रति‍बंधीत केलेल्‍या व्‍यवहार / कृती / क्रिया व्‍यतिरिक्‍त परवानगी असलेले सर्व व्‍यवहार /कृती / क्रिया यांना यापूढेही परवानगी राहील.

कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.   

Post a Comment

Previous Post Next Post