नगर, (दि.06 सप्टेंबर) : नगर शहरात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभा केेले आहे. हॉटेल नटराजमध्ये सामाजिक संस्थांचे साहाय्य घेऊन मोठ्या सुविधा उभ्या केल्या, पण आता भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याची टिका जाधव यांनी केली आहे. केवळ नावासाठी नटराज कोविड सेंटर राजकीय पक्षाने ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
येथील हॉटेल नटराजचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकली आहे. महावितरणने वीज कनेक्शन कट केले आहे. मग या इमारतीला वीज व पाणी आले कोठून? मनपाने ही इमारत ताब्यात घेऊन सुशोभीकरणासाठी मोठा खर्च केला असेल, तर ही सुविधा आपण देत आहोत एवढे सांगण्यासाठी महापौर आणि शहरप्रमुखांनी हा प्रकार केला का, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
कोरोना काळात भाजप नेत्यांसह महापौर 6 महिने घरीच होते. मार्च, एप्रिल, मेमध्ये शिवसेनेने अन्नछत्र चालवले. त्यावेळी भाजपचे हे नेते कोठे होते. आता परिस्थिती हाताबाहेर जात असताना मनपाने हे 100 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु केले आहे. मनपाने हे कोविड सेंटर चालवण्यास देण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले होते. त्याचे काय झाले ? हे सेंटर मोफत असून याठिकाणी औषधे, जेवण तसेच वाफेचे मशीन गरम काढा या सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत.
तरीदेखील केवळ आपले नाव व्हावे, यासाठी भाजपा हे सेंटर चालवीत आहे, असे सांगणे चुकीचे आहे. एका राजकीय पक्षाने सत्तेचा असा दुरुपयोग नाव कमावण्यासाठी करणे योग्य नाही, असे गिरीश जाधव यांनी म्हंटले आहे.