मराठा आरक्षणाचा निर्णय लवकर घ्यावा : सकल मराठा समाजाचे पालकमंत्र्यांना निवेदन

विद्यार्थ्यांना  प्रवेश व नोकरीत अडचण येऊ नये 

यासाठी त्वरीत आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा

 


नगर, (दि.18 सप्टेंबर) : केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नये तसेच विद्यार्थ्यांना नोकरीत अडचणी येऊ नये, यासाठी सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आ.चंद्रशेखर घुले यांच्यासह सकल मराठा समाजाचे  चंद्रकांत गाडे, गोरख दळवी, अ‍ॅड.शिवजीत डोके, बाळासाहेब पवार, दीपक लांडगे, अ‍ॅड.प्रसाद डोके, रेखा जरे आदी उपस्थित होते. 

 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. शाळा- महाविद्यालयामध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आरक्षण स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. 

 

रक्षण मिळेपर्यंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शासनाने भरावी. केंद्र व राज्य सरकारने नोकर भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी, तसेच विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. मराठा आरक्षणाची मागणी मान्य होण्यासाठी केंद्र सरकारने आंध्र प्रदेश व तामीळनाडूच्या धर्तीवर कायदा संमत करण्यासाठी आमदार व खासदारांनी केंद्र सरकारकडे बाजू मांडावी. 

 

सारथी संस्थेचे कायम स्वरूपी अस्तित्व निर्माण करावे. नगर जिल्हा जात पडताळणी विभागामध्ये स्वतंत्र अध्यक्षाची नेमणूक करून विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ करावे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत तसेच कोपर्डी प्रकरण शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडीतेला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post