पाणी उकळून प्या- नळांना तोट्या बसवा : मनपाचे आवाहन


नगर, (दि.18 सप्टेंबर) : जलजन्य आजाराचा धोका नगरकरांसमोर उभा असून शहरास  पाणीपुरवठा होत असलेल्या मुळाधरण पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसात जोरदार पाऊस झाल्याने महापालिकेच्या नळावाटे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून, याचे कारण मुळा धरणात येणाऱे नवीन पाणी असल्याचे म्हंटले आहे. क्लोरिन व तुरटीची मात्रा जलशुद्धीकरण प्रक्रियेत वाढवली असली तरी गढूळ पाणी येण्याचे प्रमाण कमी होत नाही, त्यामुळे नागरिकांनीच आता पिण्याचे पाणी उकळून पिण्याचे आवाहन महापालिकेने करत पाणी वाया जावू नये यासाठी नळांना तोट्या बसवण्याचे आवाहन केले आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात नवीन पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने विळद जलशुद्धीकरण केंद्र व वसंत टेकडी जलकुंभात क्लोरिन व तुरटीची मात्रा वाढवून पाण्याची गढुळता कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण तरीही पाणी गढूळ राहण्याचे प्रमाण दिसत असल्याने जलजन्य आजाराचा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उकळून घेण्याचे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.

नळांना तोट्या बसवा : रस्त्याने वाहणारे पावसाचे पाणी नागरिकांच्या उघड्या हौदांमध्ये जाते व त्या हौदांमध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या नसल्याने हौदातील हे पावसाचे पाणी या नळांवाटे महापालिकेच्या जलवाहिन्यांत जाते व नंतर पाणी सुटल्यावर पुन्हा हेच गढूळ पाणी सर्वत्र जाते व त्यामुळेही गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे हौदांतील नळांना नागरिकांनी तोट्या बसवाव्यात, असे आवाहनही नागरिकांना महापालिकेने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post