प्रशासकीय गतिमानतेसाठी मंत्रालयातील ई-ऑफिस सक्षमपणे कार्यान्वित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई, (दि.10 सप्टेंबर) : प्रशासकीय व्यवस्था गतिमान करतानाच जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ई – ऑफिस प्रणाली आणखी सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. त्यानुसार मंत्रालयातील नस्ती व्यवस्थापन ई-फाईल, रजा व्यवस्थापन ई-लीव्ह, ज्ञान व्यवस्थापन केएमएस, माहिती व्यवस्थापन एमआयएस या प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत.


मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली.


या बैठकीस पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक रणजित कुमार, मुख्य सचिव कार्यालयाचे उपसचिव उदय चौधरी आदी उपस्थित होते.


मंत्रालयात येणारे टपाल, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा-सुट्टी याबाबत पहिल्या टप्प्यात पूर्णपणे ई-ऑफिस प्रणाली वापरण्यात येईल. सुरूवातीला काही विभागांना पुर्णपणे ई-ऑफिस प्रणाली वापरण्यासाठी सक्षम करण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच प्रशासकीय सुधारणेचा भाग म्हणून कार्यालयीन कामकाजाच्या हस्तपुस्तिका तसेच विविध प्रकारची परिपत्रके ही यापुढे डिजिटल पद्धतीने काढण्यात येतील, असेही सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post