नगर, (दि.07 सप्टेंबर) : रस्त्याने जात असलेल्या महिलेला तिच्या पतीशी ओळख असल्याचे भासवत दोन तोळ्यांचे गंठण भामट्यांनी लांबवले. पारनेर-सुपे रस्त्यावरील संभाजीनगर परिसरात रविवारी सकाळी अकरा वाजता वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडला.
कांताबाई दरेकर बाजारात निघाल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना थांबवले. त्यांच्या पतीशी ओळख असल्याचे भासवत मुलीचे लग्न ठरले आहे, मुलीला गंठण करायचे आहे. तुमचे गंठण दाखवा, असे एकाने कांताबाईंना सांगितले. त्यांनी विश्वासाने गंठण सुपूर्द केले.
गंठणातील मणी मोजण्याचे नाटकही या भामट्यांनी केले. मुलगी जवळच असलेल्या कापड दुकानात आहे. तिला गंठण दाखवून आणतो, असे सांगत भामटे गेले. कांताबाईंनी वाट बघून नंतर कापड दुकानात जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दिसले नाहीत.
गंठण लांबवणारे भामटे परिसरातील गावांमधील असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यात ही घटना कैद झाली आहे. तब्बल अकरा मिनिटे कांताबाईंशी ते बोलत असल्याचे त्यात दिसते.