टाकळीभान येथील तरूणाचा पाण्याच्या टाकीवर जावून शोले स्टाईल थरार

नगर - श्रीरामपूर, (दि.04 सप्टेंबर) :  घरात वाद झाल्याने शोले चित्रपटातील विरूप्रमाणे पाण्याच्या टाकीवर जावून बसलेल्या तरूणाला 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्ना नंतर सुखरूप खाली घेण्यात आल्यावर ग्रामस्थांनी  सुटकेचा निश्‍वास सोडला.

या विषयी माहिती अशी की, टाकळीभान येथील कृष्णा जाधव (वय 23 वर्ष) या तरूणाचे घरी वाद झाले. त्यामुळे तो न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेच्या 80 फुट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर शोले चित्रपटच्या विरूप्रमाणे जावून बसला.

ही माहिती ग्रामस्थांना समजताच या ठिकाणी मोठी गर्दी झाली. या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी त्याला खाली येण्यासाठी विनवणी केली. यावेळी काही तरूण टाकीवर जावून त्याला खाली उतरण्यासाठी मनधरणी करू लागले. मात्र, त्याने सांगितले मी उतरणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिस व अग्नीशमन पथकास पाचारण करण्यात आले.

ही माहिती मिळताच श्रीरामपूर तालूका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मसुद खान, पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, हे. काँ. हापसे, हे. काँ. रविंद्र पवार, हे. काँ. बर्डे, पो ना. गोरे, काँ. राऊत, होमगार्ड औताडे, पोलिसमित्र बाबा सय्यद व अग्नीशमन दलाचे पथक हजर झाले. पोलिस व अग्नीशमन दलाच्या पथकाने या तरूणाला खाली उतरण्याची मनधरणी केली. मात्र, या तरूणाने खाली येण्यास नकार दिला. व त्याच्यापर्यंत कोणी येवू नये म्हणून त्याने वर जाण्यासाठी असलेली शिडी वर ओढून घेतली.

हा तरूण सकाळी 11 वाजेच्या दरम्यान टाकीवर जावून बसला होता. तेंव्हापासून ग्रामस्थ, कान्हा खंडागळे मित्र मंडळ, पोलिस, अग्नीशमन दलाचे पथक, कामगार तलाठी अरूण हिवाळे, कोतवाल सदाशिव रणनवरे, संदिप जाधव, ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक बनकर, सुनिल रणनवरे ठाण मांडून होते.

अनेकांनी विनवण्या करूनही हा तरूण खाली येत नसल्याने सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान, अग्नीशमन दलाने तो टाकीवर बसलेल्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारण्यास सुरूवात केली असता हा तरूण टाकीच्या मागण्या बाजूला जावून बसायचा. त्यामुळे फवारे मारूनही काही उपयोग होत नव्हता त्यामुळे ग्रामस्थ, पोलिस व अग्नीशमनदलही चिंतीत झाले.

सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान ऑल इंडीया पँथर सेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस विकास माघाडे व भिमशक्ती सामाजिक संघटनेचे शाखाध्यक्ष सागर पठाडे, सोमनाथ आरगडे, संभाजी कांबळे, सुनिल भवार,दवलत आहेर, पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, हे. काँ. बर्डे, काँ.राऊत, पठाण हे अग्नीशमन दलाच्या गाडीवर असलेल्या शिडीच्या साह्याने वर गेले.

या दरम्यान या तरूणास हे सर्व वरयेत असल्याचे दिसू नये म्हणून या तरूणावर पाण्याचा फवारा मारण्यास सुरूवात केली. तोपर्यंत हे सर्वजन टाकीवर गेले व त्याला पकडून दोराने बांधून टाकले व  दोराच्या साह्यानेच खाली घेतले, आणि सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. पोलिसांनी या तरूणास ताब्यात घेतले.

टाकीवर असतांना या तरूणाला शिडी ओढतांना व पाण्याचे फवारे मारतांना तो टाकीवर इकडून तिकडे पळत असतांना या तरूणाला जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसिंनी कृष्णा जाधव या तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हे. काँ. रविंद्र पवार करीत आहेत.

 

Post a Comment

Previous Post Next Post