मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


मुंबई, (दि.17 सप्टेंबर) : मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. “लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी” असे संभाजीराजे यांनी पत्रात लिहिले आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे.

 

छत्रपती संभाजीराजे यांनी  मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये खालील मुद्दे उपस्थित केले आहे.

“मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावणे सुरु केले आहे. नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करुन आणि नोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरु केला आहे” असे संभाजीराजे यांनी पत्रात लिहिले आहे.

 

“मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वतःसाठीच उभारण्याची वेळ आली आहे. देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे.” असा दाखलाही संभाजीराजेंनी दिला.

 

“न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्या उपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपणास आमची मागणी हीच राहील की, आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी” असे संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post