रस्त्यावर अतिक्रमण केल्याने उपसरपंच अपात्र


नगर, (दि.12 सप्टेंबर) : गावातील पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मंगळापूर (ता. नेवासे) विद्यमान उपसरपंच पोपट माणिक गव्हाणे यांना ग्रामपंचायत सदस्यपदावर राहण्यास जिल्हाधिकारी  राहुल  द्विवेदी  यांनी  अपात्र  ठरविले  आहे.

नेवासे तालुक्यातील मंगळापूर-गळनिंब शिवरस्त्यावर विद्यमान उपसरपंच पोपट गव्हाणे आणि इतरांनी अतिक्रमण केले आहे, अशी तक्रार लिलावती गोविंद झावरे (रा. नेवासा फाटा, ता.नेवासा) यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे दि.19 जून 2020 रोजी केली आहे. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या तक्रार अर्जाची चौकशी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांकडे सोपविली.

शेवगावचे गटविकास अधिकार्यांनी दि.6 जुलै रोजी प्रत्यक्ष मंगळापूर-गळनिंब रस्त्याची महसूल अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. सलाबतपूरचे मंडलाधिकारी, मंगळापूर तलाठी आणि पंच उपस्थित होते. महसूल विभागाकडील उपलब्ध कागदपत्रानुसार गावठाण पानंद रस्त्याची रुंदी सुरूवातीला 9 मीटर आणि शेवटी 10 मीटर अशी आहे. प्रत्यक्षात सदरचा रस्ता साधारणपणे केवळ 3 मीटर खुला असल्याचे आढळून आले.


मंगळापूरचे विद्यमान उपसरपंच पोपट गव्हाणे आणि इतर 7 शेतकर्‍यांनी पानंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे पाहणी आढळून आले. त्यांनी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला. त्यानुसार नेवासे पंचायत समितीने उपसरपंच पोपट गव्हाणे यांना अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला होता.


जिल्हाधिकार्‍यांकसमोर या प्रस्तावावर सुनावणी झाली. उपसरपंच गव्हाणे यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. मूळ तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड. भैय्यासाहेब झावरे यांनी काम पाहिले.

 

Post a Comment

Previous Post Next Post