नगर, (दि.07 सप्टेंबर) : नगर जिल्ह्यात करोनाचा वेगाने फैलाव होत असून नगर जिल्हा परिषदेतही अधिकारी,कर्मचारी करोनाबाधित आढळून आले आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने सर्वच जि.प.कर्मचार्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करावी, अशी मागणी केली होती.
या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून मंगळवारपासून या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केलं असून सर्व कर्मचार्यांना रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी जिल्हा परिषद मुख्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
सध्या 50 टक्के कर्मचारी जिल्हा परिषदेत येत असले तरी उर्वरित कर्मचार्यांनीही टेस्ट करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व कर्मचार्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर तसेच युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके यांनी केले आहे.