कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा : जिल्हा काँग्रेस आक्रमक । रस्त्यावर उतरण्याचा इशारा


नगर, (दि.16 सप्टेंबर) : संपूर्ण देश जेंव्हा लॉकडाऊन होता त्यावेळेस शेतकरी शेतामध्ये राबून अन्नधान्य पिकवत होता. आधीच हवालदिल असलेल्या शेतकर्‍यास केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घालून मोठी चपराक दिली आहे. कांद्याला चांगला भाव मिळून चार पैसे मिळतील, अशा आशेवर असणार्‍या शेतकर्‍यांवर निर्यात बंदीच्या निर्णयाने अन्याय झाला आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून तो मागे घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी दिला आहे.



अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात निवेदन दिले. तहसीलदार वखारे यांनी हे निवेदन स्वीकारले. 


यावेळी आमदार लहू कानडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, दीप चव्हाण, ज्ञानदेव वाफारे, संपतराव म्हस्के, उबेद शेख, नलिनी गायकवाड, जरिना पठाण, अज्जू शेख आदी उपस्थित होते.


निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळल्याची घोषणा केली होती. ही घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. मग अचानक हा निर्णय फिरवण्याची वेळ सरकारवर का आली? हा निर्णय म्हणजे शेतकर्यांसोबत केलेला एक विश्‍वासघात आहे. त्यावर सरकारने तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post