नगर, (दि.04 सप्टेंबर) : देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या बलिदानाने पावन झालेल्या राजगुरूनगर या पावनभूमीत त्यांच्या आयुष्यावरील 'क्रांतिवीर राजगुरू' या वेबसिरीजचा श्रीगणेशा करण्यात आला. प्रथमतः राजगुरू यांच्या वाड्यावर अधिकृतरीत्या वेबसिरीजच्या प्रतिमेचे व पोस्टरचे पूजन करण्यात आले. या वेळी या वेबसिरीजचे निर्मिती व्यवस्थापक विलास राजगुरू, लेखक आशिष निनगुरकर, कार्यकारी निर्माते प्रतिश सोनवणे, सहायक दिग्दर्शक सिद्धेश दळवी, कलावंत प्रदीप कडू, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
काव्या ड्रीम मूव्हिजची निर्मिती असलेल्या या वेबसिरीजमध्ये राजगुरू यांचा पूर्ण घटनाक्रम पाहायला मिळणार आहे. पोस्टर अनावरण प्रसंगी राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, उपाध्यक्ष शैलेश रावळ, सचिव सुशील मांजरे, विश्वस्त अजय थिगळे, बाळासाहेब कहाणे, नरेंद्र गायकवाड, सचिन भंडारी, शैलेश रावल, अध्यक्ष सुशील मांढरे, विठ्ठल पाचारणे व स्मारकाची देखभाल करणारे अरुण श्रीमंते आदी उपस्थित होते.
हुतात्मा राजगुरू यांच्यावरील अनेक सत्य गोष्टींची सखोल माहिती घेऊन व त्याचा अभ्यास करून या वेबसिरीजचे लेखन करण्यात येईल, असे निनगुरकर यांनी सांगितले. ही वेब सिरीज भव्य - दिव्य असून, राजगुरू यांच्या जीवनातील अद्यापपर्यंत दुर्लक्षित घटनाही या वेबसिरीजमधून दाखविण्याचा प्रयन्त असेल, असे सत्यशील, हर्षवर्धन व मिलिंद राजगुरू यांनी सांगितले.
राजगुरू यांचे देशासाठीचे योगदान मोठे आहे. त्यांच्यावरील टपाल तिकिटासाठी केलेला पाठपुरावा आजही माझ्या आठवणीत आहे. त्यांच्यावर निर्माण होणाऱ्या या वेबसिरीजसाठी माझे संपूर्ण सहकार्य असेल, असे सूतोवाच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. आभार सिद्धेश दळवी यांनी मानले.