मुंबई, (दि.01 सप्टेंबर) : डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. विरशैव परंपरा खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र शास्त्रोक्त पद्धतीने रुजवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामध्येही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या निधनाने विरशैव समाजाचा दिपस्तंभ हरपला, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले होते पण या क्षेत्रात त्यांचे मन रमले नाही. विरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांनी दोनवेळा तुरुंगवासही भोगला..
विरशैव तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत, उर्दू, मोडी, पारसी, इंग्रजी, कन्नड, मराठी अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभृत्व होते. त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे. धार्मिक, सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही शिवाचार्य महाराजांचे कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गाव खेड्यात शिक्षणाची गंगा पोहोचवली. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे त्यांच्या कार्यातून लिंगायत समाजाच्या कायम स्मरणात राहतील, अशी श्रद्धांजली थोरात यांनी अर्पण केली.
Tags:
Maharashtra