रेडिओ व नगर केबलद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या उपक्रमास प्रारंभ

शिक्षा समूह व हिंद सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम


नगर, (दि.13 सप्टेंबर) : सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.  समाजात जशी आर्थिक विषमता आहे तशीच विषमता शिक्षण क्षेत्रात तयार होती की काय अशी आजची परिस्थिती आहे. श्रीमंत कुटुंबातील मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.  पण ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाही, जी मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत.  त्यांच्यासाठी शिक्षा समुह व हिंद सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आय लव्ह नगर व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन या संस्थेच्या सौजन्याने रेडिओ नगर ९०.४ एफ.एम. व हिंद सेवा मंडळाचे सौजन्याने केबलद्वारे शिक्षण देण्याचा एक अनोखा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  
 

या उपक्रमासाठी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, मानद सचिव संजय जोशी, सीताराम सारडा विद्यालयाचे चेअरमन प्रा मकरंद खेर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.


या उपक्रमाचे उद्घाटन ५ सप्टेंबर  रोजी मा. जयंतची उमराणीकर (संरक्षण व रणनीती तज्ज्ञ, भारत सरकार) यांचे शुभहस्ते ऑनलाइन करण्यात आले. उपक्रमाचा प्रारंभ हा १४ सप्टेंबर २०२० पासून रेडिओ व नगर केबल वर करण्यात येत आहे. रेडिओ नगर ९०.४ एफ. एम. वर इ. ३ री व ४ थी साठी सोमवार ते शुक्रवार दुपारी १२ ते २ या वेळेत व रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत तसेच इ. ५ वी ते ८ वी साठी दररोज दुपारी २ ते ३ या वेळेत प्रसारण करण्यात येणार आहे. 


तर नगर केबल नेटवर्क याद्वारे इ. ५ वी ते ८ वीसाठी दररोज सकाळी १० ते १२ व दुपारी ४ ते ६ या वेळेत प्रक्षेपण करण्यात येणार आहे. (रेडिओ व केबल नेटवर्क प्रसारणाचे वेळापत्रक सोबत जोडले आहे) अशी माहिती शिक्षा समूहाचे अहमदनगर जिल्हा प्रमुख सुनिल रामदासी यांनी दिली.


या उपक्रमात हिंद सेवा मंडळ, प्रगत विद्यालय, देवेंद्रनाथ विद्यालय, वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्था, ओम शिवकृपा प्रसारक मंडळ, आनंद विद्यालय तसेच शिक्षा समूहामध्ये कार्यरत असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ३८ शिक्षण संस्थांमधील शिक्षक बंधू भगिनींचे अनमोल लाभले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post