पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी ठेवण्याची मागणी


मुंबई, (दि.17 सप्टेंबर) : राज्यात येत्या काही महिन्यात तब्बल १२ हजार ५२८ पोलिसांच्या मेगा भरतीसाठी बुधावीर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आला. ही पदे भरण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. त्यानुसार पदे भरण्यास मान्यता देण्यात आली.

 

दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा रिक्त ठेवा अशी मागणी केली आहे. विनायक मेटे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत ही मागणी केली. दरम्यान अनिल देशमुख यांनी पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासू असं म्हटलं आहे.

 

विनायक मेटे यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवा. त्याच्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय घ्या आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी घेऊन नंतर भरुन टाका. मराठा समाजातील तरुण-तरुणींना भरतीत सामावून करुन घेतलं तरच हे सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे असं म्हणता येईल. अन्यथा सगळी संतापाची प्रतिक्रिया रस्त्यावर पहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही”. 

 

दरम्यान अनिल देशमुख यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं म्हटलं आहे. “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासू. राज्य सरकाराचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे,” असं ते म्हणाले आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post