नगर, (दि.01 सप्टेंबर) : तक्षीला स्कूलच्या वतीने वर्चुअल पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या रंग दे बसंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध 23 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेद्वारे देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, शहीद जवान व कोरोनायोध्दांना सलाम करण्यात आले.
दरवर्षी तक्षिला स्कूलच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये रंग दे बसंती आंतर शालेय स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा उपक्रम वर्चुअल पध्दतीने घेण्यात आला. या स्पर्धेचा शुभारंभ स्कूलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांच्या हस्ते ऑलनलाईन पध्दतीने करण्यात आला.
यावेळी तन्वीर खान, निरज व्होरा, कोमल विजन, अनिता बेरड, सारिका आनंद उपस्थित होते. तर सर्व शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांनी वर्चुअल पध्दतीने आपला सहभाग नोंदवला.
ऑनलाईन स्पर्धेचा शुभारंभ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य व गीत सादर केले. रंग दे बसंती आंतरशालेय स्पर्धेत फॅशन शो, फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स, मोनो अॅक्ट, कथाकथन, अॅड मॅड शो, फ्लॉवर डेकोरेशन, बेस्ट ऑफ वेस्ट, स्टँड अप कॉमेडी, कुकिंग फ्रुट कार्व्हिंग, वाद-विवाद, छायाचित्रण अशा विविध प्रकारच्या 23 स्पर्धांचा समावेश होता. यामध्ये प्री-प्रायमरी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या 20 शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला.
जयश्री मेहेत्रे म्हणाल्या की, देशभक्त व स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देश स्वातंत्र्य केले. तर सिमेवर असलेल्या जवानांमुळे तसेच कोरोनायोध्दांमुळे सध्या आपण सुखी जीवन जगत आहोत. कोरोना महामारीचा संकट टळण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडायचे आहे.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजल्यास सशक्त भारताची निर्मिती होणार असल्याची भावना त्यांनी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. या स्पर्धेचे परीक्षण त्या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी योगदान दिले.