खरीप हंगाम पिक कर्ज वाटपास जिल्हा बँकेची 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत : चेअरमन सिताराम पाटील गायकर

 

नगर, (दि.17 सप्टेंबर) :  2020-21 खरीप हंगाम पिक कर्ज वाटपासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत 15 सप्टेंबर पर्यंत होती. परंतु शेतकर्‍यांच्या मागणी व अडचणीचा विचार करुन आणि कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर बँकेने पिक कर्ज वाटपाची मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, व्हा.चेअरमन रामदास वाघ व जेष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.


अहमदनगर जिल्हयात सर्वत्र पाऊस चांगला झाला असुन जिल्हयातील शेतकर्‍यांची पिक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठया प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे. बँकेने शेतकर्‍यांच्या वि.का.सेवा सोसायटी 


मार्फत जनरल क.म.पत्रक व पुरवणी कर्ज मागणीस मंजुरी देण्यात आलेल्या असुन अद्याप अनेक शेतकरी सभासदांनी कर्ज उचल केली नसल्याने त्यांची पिक कर्जाची मागणी येत आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 या योजने अंतर्गत लाभ मिळाले नंतर ज्या शेतकरी सभासदांचे कर्ज खाते निरंक झालेले आहे अशा शेतकरी सभासदांकडुन नव्याने खरीप पिक कर्जाची मागणी होत आहे.


तसेच जिल्हयातील काही प्रा.वि.का.सेवा संस्थांना तांत्रिक अडचणीमुळे कर्ज वाटपास विलंब झालेला आहे अशा संस्था मुदतीत वाढी बाबत मागणी करीत आहेत. शासनाने दिलेले चालु खरीप हंगामासाठीचे वाटपाचे उद्दिष्ट रु.1498/- कोटीचे दिले होते ते पुर्ण करुन बँकेने उद्दिष्टा पेक्षा जास्त कर्ज वाटप केलेले असुन आज रोजी बँकेने 2,90,985 शेतकरी सभासदांना रक्कम रुपये 1,769/- कोटीचे वाटप केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, व्हा.चेअरमन रामदास वाघ व जेष्ठ संचालक शिवाजीराव कर्डीले यांनी दिली. 


बँकेने या कर्ज वाटपाचे वाढवुन दिलेल्या मुदतीचा लाभ जिल्हयातील शेतक-यांनी घेण्याचे अवाहन चेअरमन.गायकर पाटील यांनी केले असुन बँकेने शेतकरी व शेती विकास हा केंद्र बिंदु मानुन बँक नेहमीच शेतक-यांच्या हितांच्या दृष्टीनी निर्णय घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post