गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदाच जायकवाडीतून मोठा विसर्ग, धरणाचे 27 दरवाजे चार फुटाने उघडले


औरंगाबाद,  (दि.18 सप्टेंबर) :  जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पत्रात 94 हजार 320 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे 2 ते 4 फुटाने उघडून विसर्ग सुरु आहे. धरणाचे 10 ते 27 दरवाजे चार फुटाने उघडले, तर 1 ते 9 दरवाजे दोन फुटाने उघडले. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास 94 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. 

 

जायकवाडी धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने गोदावरी नदीला तुफान पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे.त्याच पार्श्वभूमीवर गोदावरी नदी काठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना प्रचंड सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरामुळे औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये याचा परिणाम जाणवणार आहे. जायकवाडी धरणात सध्या एकूण पाणीसाठा 2897.100 दलघमी असून त्याची एकूण टक्केवारी 99.44 टक्के इतकी आहे. तर धरणातील जिवंत पाणीसाठा 2158.994 दलघमी इतका आहे.

Post a Comment

Previous Post Next Post