नवी दिल्ली, (दि.31 ऑगस्ट) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती. फुफ्फुसातील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे आज सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितले होते.
प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.. मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी 2009 ते 2012 या काळात मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा होती.
इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1969 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ‘प्रणवदा’ यांची राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते.
मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात 22 मे 2004 ते 26 ऑक्टोबर 2006 पर्यंत ते भारताचे संरक्षण मंत्री होते. 2007 मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. 2010 मध्ये ‘फायनान्स मिनीस्टर ऑफ द इअर फॉर एशिया’ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.