नगर, (दि.31 ऑगस्ट) : जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व वृक्ष बँकेच्या वतीने माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाभर राबवित असलेल्या वृक्षरोपण व संवर्धन अभियानातंर्गत ससेवाडी (ता. नगर) येथील सिना नदीच्या उगमस्थानी असलेल्या सिनाशंकर महादेवाच्या मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या निसर्गरम्य परिसरात उपस्थितांनी देशी व औषधी वृक्षांची लागवड केली. प्रहारचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, सरपंच संजय ससे, सचिन पेंडभाजे, नवनाथ ससे, विष्णू ससे, बाबासाहेब जरे, रोहित मगर, मोहित मगर, सुरज मगर, सौरभ मगर, सोमनाथ मगर, शौर्यराज मगर, जय हिंदचे शिवाजी पालवे, संतोष मगर, संजय पाटेकर, मयुर नवगिरे आदि उपस्थित होते.
संतोष पवार म्हणाले की, माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवित असलेले उपक्रम प्रेरणादायी आहे. देशसेवा करुन समाजसेवेसाठी माजी सैनिक योगदान देत असून, त्यांनी उभी केलेली वृक्ष बँक समाजाला एक वेगळी दिशा देणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिना नदी ही शहराची ओळख असून, त्याचे उगमस्थान निसर्गरम्य करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून, प्रत्येक गाव पातळीवर माजी सैनिक वृक्षरोपण अभियान राबवून झाडे जगविण्यासाठी कटिबध्द असल्याचे शिवाजी पालवे यांनी सांगितले.
या परिसरात वड, निलमोहर, गुलमोहर, करंज, चिंच, आवळा, उंबर, जासवंद, कन्हेर, पांढरा चाफा व इतर फुल झाडे लावण्यात आली. ससेवाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तर संतोष मगर यांनी आभार मानले.