जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
नगरमधील जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन सोशल डिस्टन्सिंग पाळून साजरा करण्यात आला. प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मार्गदर्शक प्रा.सुनिल जाधव, महाराष्ट्र राज्य क्रीडा संघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, अप्पासाहेब शिंदे, डॉ.प्रसाद उबाळे, क्रीडा मार्गदर्शक अजय पवार, ज्ञानेश्वर खुरांगे, नंदकिशोर रासने, महेंद्र हिंगे, प्रा.संजय साठे, शैलेश गवळी, संतोष खैरनार, घनश्याम सानप, विशाल गर्जे आदींसह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, मार्गदर्शक, खेळाडू, सर्व तालुक्यांचे क्रीडा प्रमुख उपस्थित होते.
प्रा.सुनिल जाधव म्हणाले, नगर जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक अतिशय मन लावून काम करतात. खेळाडू हा केंद्रबिंदू मानून क्रीडा क्षेत्रासाठी जे जे शक्य आहे, ते करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. नगर जिल्ह्यात प्रचंड गुणवत्ता आहे. त्यासाठी आवश्यक दर्जेदार पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने क्रीडा विभागाने प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील, यासाठी सामूहिक प्रयत्न करू. शेवटी करोना समस्याशी सामना करण्याची सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली.
याप्रसंगी डॉ.प्रसाद उबाळे यांनी करोना कालावधीत क्रीडा खेळाडू, क्रीडा कार्यकर्ते यांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर खुरांगे यांनी केले. नंदकिशोर रासने यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी दिलीप दिघे, दिपाली बोडखे, रमेश जगताप, गौरव परदेशी, बाळू पवार यांनी परिश्रम घेतले.