पोलिस दलाच्या सेवेत नवीन सात वाहने दाखल : पोलिस सेवेसाठी आता ‘100’ बरोबरच ‘112’ नंबर

------------------------------

नगर, (दि.28 ऑगस्ट) : नगर जिल्हा पोलिस दलाच्या सेवेत नव्याने सात वाहने दाखल झाली आहेत. यामध्ये 5 बोलेरो व 2 टीयूव्ही चारचाकी वाहने आहेत. राज्य शासनाकडून उपलब्ध झालेली ही वाहने विविध पोलिस ठाण्यांसाठी देण्यात येतील. दरम्यान, डायल 100 यूजर्सवर कॉल केल्यानंतर संबंधित पोलिस स्टेशनला त्याची माहिती दिली जाते. त्या अनुषंगाने 112 क्रमांकाचा वापरही आता होईल.

नव्या वाहनांचे पूजन जिल्हा पोलिसप्रमुख अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपअधीक्षक संदीप मिटके, अधीक्षक (गृह) प्राजक्ता सोनवणे, उपअधीक्षक (ग्रामीण) अजित पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक परदेशी आदी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक सिंह यावेळी म्हणाले, नागरिकांनी 100 यूजर्स नंबरवर कॉल केल्यानंतर ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास मिळतात. त्यानंतर माहिती घेऊन संबंधित पोलिस स्टेशनला कल्पना देऊन पुढील कार्यवाही होते. यापुढे 100 नंबर बरोबरच 112 नंबरच्या माध्यमातून याच प्रकारची सेवा पोलिसांतर्फे दिली जाईल.

अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील म्हणाले की, एक शून्य शून्य हा नंबर सर्वांनाच तोंडपाठ आहे. मात्र, यापुढे 112 नंबरद्वारे अडचणीत सापडलेल्या नागरिकांची पोलीस तत्काळ मदत करतील. नवीन वाहने मिळाल्यामुळे 112 ही सेवा जनतेसाठी अधिक गतिमान होईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही वाहने सेवेत दाखल होतील, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post