ऑनलाईन औषध विक्रीवर न्यायालयाचे निर्बंध
राज्यात आदेशाची अंमलबजावणी करावी : केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची मागणी
नगर (दि.08) : दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीवर निर्बंध घातलेले असुन न्यायालयाच्या आदेशाचे देशातील सर्वच राज्यांनी तंतोतंत पालन करण्याच्या सुचना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी दिलेले आहेत. त्यामुळे सदर आदेशाचे गांभिर्य लक्षात घेऊन प्रशासनाने राज्यात होणारी ऑनलाईन बेकायदेशीर औषध विक्री थांबविण्यासाठी पावले उचलावीत. अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल. तसेच प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.
या संदर्भात संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र बलदोटा यांनी पत्रकात म्हटले आहे की, दिल्ली उच्च न्यायालयाने डॉ. जहिर अहमद यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान दि.12 डिसेंबर 2018 रोजी दिलेल्या निर्णयात ऑनलाईन औषध विक्रीवर निर्बंध लावण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. व्ही. जी. सोमानी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी विशेष पत्रकाद्वारे 28 नोव्हेंबर 2019 रोजी देशातील सर्व राज्याच्या अधिकारी यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन आपापल्या राज्यात करण्याबाबत सुचना जारी केल्या आहेत.
यावेळी शहर व तालुका केमिस्ट असो. चे अध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव विलासराव शिंदे, खजिनदार महेश रच्चा, अनिल झंवर, अमित धाडगे, नितीन बोठे, शरद डोंगरे, भाऊसाहेब काळे, भरत सुपेकर, अमित धोका, अशोक रेनगुंटला, तसेच जिल्हा व शहर कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar