कोरठणला नव्याची पौर्णिमा उत्साहाने संपन्न



नगर, (दि.11) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगावरोठा ता.पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे माघी पौर्णिमा (नव्याची पौर्णिमा) उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. पौर्णिमेनिमित्त भाविकांनी विविध धार्मिक विधी करीत खंडोबाचे दर्शन घेतले पौर्णिमेनिमित्त भाविकांनी नवीन धान्याचे दिवे तसेच नैवैद्य देवाला अर्पण केले.

माघी पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्व आहे. शेतातून नवीन झालेले धान्य घरात येते. या नवीन धान्यापासून बनविलेले पिठाचे दिवे तयार करून मंदिरात अर्पण करतात तसेच शेतकरी नवीन झालेल्या धान्याचा काही अंश प्रसाद म्हणून मंदिरात अर्पण करतात,पुरणपोळीचा नैवद्य करून देवाला अर्पण करण्याची परंपरा या पौर्णिमेला जोपासली जाते.

सकाळी ६ वाजता श्री खंडोबास मंगलस्नान करण्यात आले,साजशृंगार झाल्यावर अभिषेक पुजा झाली यानंतर खंडोबाची  महाआरती करण्यात आली,यावेळी देवस्थानचे देवस्थानचे विश्वस्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी ९ वाजता देवाच्या उत्सव मूर्तीची पालखीतून प्रदक्षिणा मिरवणूक ढोल ताश्याच्या,लेझीमच्या तालावर निघाली.भाविक भक्ताचे पालखी दर्शन व ओलांडा दर्शन, लंगर तोडणे,नैवैद्य हे धार्मिक विधी होऊन पालखी मंदिरात परत आली जय मल्हार सेवा मंडळ, भोरवाडी ता जुन्नर यांचे कडून महाप्रसाद वाटप करण्यात आले.

पौर्णिमेचा पर्वकाळ रविवार असल्याने भाविकांची व नव्याच्या पोर्णिमेमुळे शेतकरी मोठ्या संख्नेने आले होते. देवस्थानतर्फे दर्शन व्यवस्था,वाहने पार्किंग,पिण्याचे पाणी,महाप्रसाद असे नियोजन करण्यात आले होते अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष एड पांडुरंग गायकवाड यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post