जि.प.चे कार्यकारी अभियंता अर्जुन आंधळे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा







नगर (दि.04) : शासकीय सेवा अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रातून वयोमानानुसार सेवानिवृत्त व्हावेच लागते. सेवाकाळात प्रत्येक जण सर्वांच्या सहकार्यातून आपले कर्तव्य बजावत असतो. यातून त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव निर्माण होतो. कार्यकारी अभियंता पदावरुन निवृत्त होणारे अर्जुन आंधळे यांच्याकडेही अशा अनुभवांची मोठी शिदोरी आहे. त्यांनी आपल्या कौशल्याने शासकीय सेवेत निश्चितच ठसा उमटविणारे काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा. सेवानिवृत्ती हा प्रत्येक नोकरदाराच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असून यानंतरच्या आयुष्यातही प्रत्येकाने आपले छंद जोपासणे, कुटुंबासाठी अधिक वेळ देणे तसेच समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केल्यास सुखीसमाधानी आयुष्याची अनुभूती त्यांना मिळू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले.

नगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन आंधळे हे तब्बल 37 वर्षांच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा भोर यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, डॉ.संदीप सांगळे, डा.बी.बी.नागरगोजे, नितीन उबाळे, लहानू निबे, राजेंद्र लोखंडे, ए.वाय.नरोटे, राहुल कांबळे, बलराज कोळी आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आंधळे यांनी सेवाकाळात दिलेल्या योगदानाचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना आंधळे म्हणाले की, शासकीय सेवेत अभियंता म्हणून काम करताना जालना, नाशिक, औरंगाबाद, नगर जिल्ह्यांमध्ये काम केले. प्रत्येक ठिकाणी वरिष्ठांचे तसेच सहकारी अधिकारी, कर्मचार्‍यांचे चांगले सहकार्य मिळाले. त्यामुळे सेवानिवृत्त होताना मनात अनेक चांगल्या आठवणी दाटून येतात. सर्वांच्या शुभेच्छा व प्रेम माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहिल,   मी ज्या ज्या ठिकाणी सेवा केली त्याचा ठिकाणे किमान वडाचे पन्नास तरी वृक्ष लागवड केली .असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post