मनपा पोटनिवडणुकीत उदासिनता : अवघे 31.1 टक्के मतदान


 
शिवसेना की भाजप उद्या होणार फैसला

नगर (दि.06) : महानगरपालिकेच्या प्रभाग 6 मध्ये अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग या रिक्त जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. या  पोट निवडणुकीत मतदारांचे उदासीनता दिसून आली. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. सकाळपासूनच धिम्या गतीने मतदान सुरु झाले. सायंकाळपर्यंत सरासरी 31.1 टक्के मतदान झालेे. शुक्रवारी सकाळी जुन्या महानगरपालिका येथे 10 वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. शिवसेना की भाजप हे चित्र 11.30 पर्यंत स्पष्ट होईल.

प्रभाग 6 अ अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. शिवसेनेच्या उमेदवार अनिता दळवी व भाजपच्या पल्लवी जाधव यांच्यात ही दुरंगी लढत होती. या प्रभागात 13 हजार 621 मतदार आहेत. मतदानासाठी 16 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले .

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काम पाहिले. मतदान केंद्रांवर तोफखाना पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुपारच्यावेळीही मतदान केंद्राबाहेर शुकशुकाट पाहायला मिळाला. दुपानंतर मतदानाचा वेग वाढल अशी अपेक्षा होती मात्र म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. पोलिसांकडून मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून जुन्या मनपा कार्यालयात मतमोजणीस सुरूवात होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post