भरदिवसा महिलेच्या हातातून 2 लाखांची रोकड लांबविली


नगर (दि.09) : शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या आनंदधाम रस्त्यावरुन पायी चाललेल्या महिलेच्या हातातील 2 लाखाची रोकड असलेली पिशवी मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पळवून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.7)  दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सौ. मंगल प्रविणचंद पिपाडा (वय 56, रा.सुपा, ता.पारनेर) या आनंदधाम रोडने आचार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल समोरुन पायी जात असताना टिप टॉप ड्रायक्लिनर्स समोर मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम आले व त्यांनी सौ. पिपाडा यांच्या हातातील पिशवी हिसकावून पोबारा केला. या पिशवीत सुमारे 2 लाख 2 हजार रुपयांची रोकड होती. चोरट्यांनी पिशवी हिसकावताच सौ. पिपाडा यांनी आरडा ओरडा केला मात्र परिसरातील नागरिकांना काही समजण्याच्या आतच चोरटे मोटारसायकलवर सुसाट वेगात पसार झाले.

भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी सौ. पिपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. धोत्रे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post