नगर (दि.06) : फेज टू पाणी योजनेची कामे अपूर्ण असून पाच - सहा दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. पाणी वितरण व्यवस्था सुरळीत नसतानाही पाणीपट्टीत दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव का ठेवला, असा सवाल करीत स्थायी समिती सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाला चांगलेच धारेवर धरले. अखेर पाणीपट्टीच्या दहा टक्के वाढीस मंजुरी देत स्थायी समितीने हा विषय महासभेकडे सोपविला. फेज टू योजना सुरळीत सुरू झाल्यानंतर पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्याचा आदेश यावेळी देण्यात आला.
घरगुती पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याच् या प्रस्तावावर आज स्थायी समितीत चर्चा झाली. अर्धा इंचसाठी दीड हजार रूपयांऐवजी तीन हजार,पाऊण इंचसाठी तीन हजाराऐवजी सहा हजार तर एक इंचसाठी सहा हजारांऐवजी दहा हजार रूपये पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव होता. त्यावर स्थायी समितीने निर्णय घेत दहा टक्क्याची याची वाढ सुचविली आहे. या सभेस सभापती मुदस्सर शेख, सुभाष लोंढे, गणेश भोसले, आशा कराळे, सोनाली चितळे, सुवर्णा जाधव, उपायुे प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता महादेव काकडे, अभियंता परिमल निकम, मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर आदी यावेळी उपस्थित होते.
शहर व उपनगरातील नागरिकांना सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. पाणी वितरण अगोदर सुरळीत करा, त्यानंतर पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव द्यायला पाहिजे होता, असे सुभाष लोंढे म्हणाले. सात टक्के वाढ करण्याची जिल्हाधिकार्यांची सूचना होती. मात्र तीही वाढ झाली नसल्याचे अभियंता काकडे यांनी सांगितले. फेट टू ची कामे रेंगाळल्यावरून गणेश भोसले यांनी पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. अनधिकृत नळकनेक्शन नियमित करण्याची सूचना सभापती शेख यांनी केली.
Tags:
Ahmednagar